रहिमतपूरला देशातील पहिले योगग्राम बनवू – डॉ. राजेंद्र शेंडे

  • Home
  • Latest News
  • रहिमतपूरला देशातील पहिले योगग्राम बनवू – डॉ. राजेंद्र शेंडे

आयुष मंत्रालयाच्या योग प्रशिक्षण केंद्राचा रहिमतपूर येथे शुभारंभ

रहिमतपूर – आजच्या धक्काधक्कीच्या जीवनात आबालवृध्दांच्या निरोगी व आनंदी जीवनासाठी योगसाधना हा एकमेव रामबाण उपाय आहे. म्हणूनच देशातील पहिले योगग्राम म्हणून रहिमतपूरच्या वैभवशाली परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवण्यासाठी सुरु केलेल्या योग प्रशिक्षण केंद्रास रहिमतपूरकर उदंड प्रतिसाद देतील असा विश्वास जागतिक पर्यावरण तज्ज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे यांनी व्यक्त केला.
वैश्विक विचारातून जनसामान्यांच्या विकासातून सामर्थ्यशाली राष्ट्रनिर्मितीचे स्वप्न बाळगून डॉ. राजेंद्र शेंडे यांच्या संकल्पनेतून स्थापन केलेल्या रहिमतपूरच्या श्रीराम फाउंडेशनच्या पुढाकाराने आणि मुदिता योग व सूर्या फाउंडेशनच्या सहकार्याने आयुष मंत्रालयाच्या योग प्रशिक्षण केंद्राचा रहिमतपूरमध्ये ९ में ला शुभारंभ करण्यात आला. मुदिता योग राजकोट गुजरात चे डॉ. गौरांग व्यास, पुनरुत्थान विद्यापीठ अहमदाबादच्या शिक्षण विभागाचे प्रमुख रामचंद्र भोसले, रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष आनंदा कोरे, सातारच्या प्रतिथयश योग थेरपिस्ट अनुराधा इंगळे, सातारचे योग प्रशिक्षक सर्जेराव कातिवले यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.
डॉ. राजेंद्र शेंडे म्हणाले की, ‘इवलेसे रोप लावियले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी’ ही माऊलींची ओवी सिद्ध करावयाची आहे. तसेच ऐतिहासिक रहिमतपूर या जन्मभूमीच्या ऋणातून उतराई होण्याच्या सद्भावनेने तसेच भारतीय संस्कृतीच्या शिक्षणाचा प्रचार-प्रसार करण्याच्या उदात्त हेतूने या संस्थेची स्थापना हिंदुस्तान फिड्स श्री नितीन माने व चौंडेश्वरी शिक्षण संस्थेचे  श्री अरुण माने यानी केली आहे.
योग प्रशिक्षणाबरोबरच नजीकच्या काळात मुल्य शिक्षण, संस्कृत भाषा, सेंद्रिय शेती, पर्यावरण संरक्षण यासह प्राचीन ते आधुनिक ज्ञान शाखांचे विशेष प्रशिक्षण या केंद्राद्वारे प्रभावीपणे अत्यल्प शुल्कामध्ये उपलब्ध करून दिले जाईल अशी ग्वाही डॉ. शेंडे यांनी दिली. गौरांग व्यास यांनी संस्थेची ध्येय धोरणे लक्षात घेऊन या फाउंडेशनला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. योग साधनेची अखंड व अभंग सेवा देण्याचे अभिवचनही त्यांनी दिले. योगसाधना ही रहिमतपूर पंचक्रोशीतील लोकांच्या मन व शरीराच्या आरोग्यासाठी चैतन्यदायी ठरो, हा आरोग्यदीप तुमचे जीवन उजळत ठेवेल. हा योगयज्ञ व भारतीय संस्कृती, परंपरेचे पुनरुज्जीवन हे सारे श्रीराम फाउंडेशनला ज्ञानदानाचे अभिमत विद्यापीठ बनवेल असा सार्थ विश्वास असल्याचे डॉ. गौरांग व्यास यांनी सांगितले. आनंदा कोरे यांनी रहिमतपूर हे देशातील पहिले योगग्राम बनवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही दिली. या उद्दिष्टपूर्तीसाठी प्रशासकीय अधिकारी पांडुरंग पवार यांचे भरीव योगदान लाभत आहे. कार्यक्रमाला रहिमतपूरच्या चौंडेश्वरी एज्युकेशन सोसायटीचे सचिव अरुण माने, प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व महाविद्यालयाच्या रुक्मिणी बेहेन, प्रियांका बेहेन, राजू सय्यद, आर. पी. वाघ, ग्वाल्हेरच्या सिंदीया राजघराण्याचे राजपुरोहित चंद्रकांत शेंडे, सौ. रोहिणी शेंडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *