जागतिक संगीत दिवस: मानवी जीवनातील संगीताचे महत्त्व व इतिहास

  • Home
  • Latest News
  • जागतिक संगीत दिवस: मानवी जीवनातील संगीताचे महत्त्व व इतिहास

संगीत हे समुद्राप्रमाणे अथांग आहे. आपण जितके खोल जाऊ तितक्या नवनवीन गोष्टी आपल्याला उमगत जातात. जागतिक संगीत दिनाची सुरुवात नेमकी कशी झाली? कोणकोणत्या देशात जागतिक संगीत दिवस साजरा केला जातो? जाणून घेऊया…

संगीत आवडत नाही, संगीताशी आपला काही एक संबंध नाही, असे म्हणणारा मनुष्य क्वचितच सापडेल. कुठेही गाण्यांचा आवाज ऐकताच आपले कान लगेच त्या नादमाधुर्याचा वेध घेतात. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आणि क्षणाक्षणाला संगीत आपल्याला साथ देत असते. नैराश्य, तणावसारख्या आजारांना सामोरे जातो, तेव्हा त्यातून बाहेर पडण्यासाठी संगीत मुख्य भूमिका पार पाडत असते. प्रत्येक सुख, दुःखाच्या क्षणी आपल्याला संगीत यथोचित साथ देत असते. जन्मापासून ते अगदी मृत्यूपर्यंत मानवासोबत संगीत असतेच. जीवनातला खरा सोबती संगीत आहे, असे म्हणायला काही हरकत नाही. संगीत हे व्यापक आणि अथांग आहे. या जागतिक संगीत दिनाची सुरूवात कधी आणि कोठे झाली? जाणून घेऊया…

जागतिक संगीत दिनाची पार्श्वभूमी :-
जगात जेव्हापासून नादाची निर्मिती झाली असेल तेव्हापासूनच संगीत निर्माण झाले आहे. जगात संगीताचे विविध प्रकार आहेत. प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. सर्वांत प्रथम जागतिक संगीत दिनाची सुरूवात फ्रान्समध्ये झाली. फ्रान्समध्ये या दिनाला ‘फेटे डेला म्युसिक्यू’ या नावाने देखील ओळखले जाते. २१ जून १९८२ रोजी प्रथम जागतिक संगीत दिवस साजरा करण्यात आला. फ्रान्समधील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक मॉरीश फ्लेरेट यांनी तेथील सांस्कृतिक विभागासाठी या दिनाची सुरुवात केली होती. अर्जेंटिना, ब्रिटेन, लक्जमबर्ग, जर्मनी, चीन, लेबनॉन, कोस्टा रिका या देशांसोबत भारतात देखील हा दिन साजरा केला जाते.

सण-उत्सवांमधील संगीत :-

घरामध्ये काही मंगल क्षण असला. कुणाचा जन्म झाला असेल, कुणाचा विवाह असेल तर आजही आपल्याकडे सनई चौघडा वाजविला जातो. सनईचे सूर काणावर पडताच मन उल्हासीत होते. प्रत्येक धर्मांमध्ये संगीताला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. कोणतीही पूजा-अर्चा करताना संगीताचा आधार घेतला जातो. मंदिरामध्ये आरती करताना घंटीचे विशिष्ट गुंजण सुरू असते. आरती म्हणताना एका सुरा-तालात म्हटली जाते. एवढेच नव्हे तर पूजेच्या वेळी वाजवल्या जाणाऱ्या टाळ्यांची लयसुद्धा एक असते.

स्फुर्तीदायक संगीत

सूर, ताल, लय यांच्या अनोख्या संगमातून निघणा-या लहरींवर मन बेभान होवून डोलायला लागते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शाहीर आपल्या कवनांमधून मावळ्यांना प्रेरीत करण्याचे काम करत. स्फुरण चढवण्याचे काम करत. त्यामुळेच मुठभर मावळे हजारोंच्या फौजांशी लढण्यास तयार असत. लता मंगेशकर यांनी गायलेले ऐ मेरे वतन के लोगो हे गीत ऐकताच अंगावर रोमांच उभे राहतात. देशप्रेम, देशनिष्ठा तयार होतात.

आरोग्यदायी संगीत

तज्ज्ञांच्या संशोधनानुसार, संगीत ऐकल्यामुळे स्मरणशक्ती वाढते. जर तुम्हाला मायग्रेनचा त्रास असल्यास संगीत ऐकणे फायदेशीर ठरू शकते. तुमच्या हृदयाचे ठोके वाढले असतील तर ते सुरळीत करण्यासाठी सुरेल संगीत ऐकणे उपयोगी ठरू शकते. त्याचबरोबर श्वसनासंबंधीचे आजारही बरे होऊ शकतात. उच्च रक्तदाबाचा त्रास असेल, तर तुमच्यासाठी सुमधूर संगीत ऐकणे फायदेशीर ठरू शकते. सुरेल वा तुमच्या आवडीच्या संगीताने तुमचे मानसिक संतुलन उत्तम ठेवण्यास मदत होते. संगीताच्या तालावर व्यायाम किंवा नृत्य केल्याने तुमचे वजन नियंत्रणात राहू शकते.
🎼🌹 जागतीक संगीत दिनाच्या मनःपुर्वक शुभेच्छा🌹🎼



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *