रहिमतपूरकर रसिक मंत्रमुग्ध
१४ डिसेंबर २०२३—-प्रतिनिधी, रहिमतपूर
व्यासपीठावर स्थानापन्न दोन चिमरड्या… सतारीच्या अतिशय मधूर स्वरांनी सर्व वातावरण भारावलेले… भन्नाट जुगलबंदीचे सादरीकरण… वडिलच तबल्याच्या साथसंगतीला… अशा सुरेल वातावरणात रहिमतपुरकरांची देव दिवाळीची संध्याकाळ बहारदार बनली. निमित्त होते ते सुप्रसिद्ध सतारवादक सानवी आणि सोहना कुलकर्णी या बालकलाकारांची सतारवादनाची जुगलबंदी आणि मुलाखत या अनोख्या संगीत सोहळ्याचे.

कै. माधवराव शेंडे स्मृती कलादालन, श्रीराम फाऊंडेशनचे आंतरराष्ट्रीय पर्यावरण तज्ज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे यांच्या संकल्पनेतून रहिमतपूरमध्ये दरवर्षी सांगितीक कार्यक्रमाची मेजवानी आयोजित केली जाते. यंदा वीरशैव लिंगायत समाज मठात सायंकाळी ६ वाजता ही संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे यांनी केले.

या मैफिलीचे आकर्षण होते ते सानवी आणि सोहना यांच्या सतारवादन जुगलबंदीबरोबरच त्यांचे पिता तथा गुरुवर्य समीप कुलकर्णी यांनी केलेली तबल्याची साथसंगत. याशिवाय, कलादालन रहिमतपूरचे विद्यार्थी अवनी भोसले, अथर्व पवार, पृथ्वीराज गुरव, विघ्नेश घाडगे, जान्हवी साखरे, स्वरा काजळे या विद्यार्थ्यांनी भरतनाट्यम, अर्णव मोरे याने तबलावादन, ईश्वरी कोळी, श्रद्धा पवार, अनुजा चव्हाण, स्वरांजली कुलकर्णी, समर्थ कणसे यांनी गायन सादर केले. स्वागतपर मनोगत अरुण माने यांनी केले. या मैफलीसाठी कलादालनचे अरुण माने, नितीन माने आणि मधुमती माने यांनी परीश्रम घेतले.
म्हणून देव दिवाळी संध्या
संगीत क्षेत्रात अनमोल योगदान दिलेल्या कै. माधवराव शेंडे यांच्या स्मृती जपण्यासाठी आणि संगीताचा प्रचार व प्रसार होण्यासाठी शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे यांच्या पुढाकाराने रहिमतपूरमध्ये दरवर्षी संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर किर्ती प्राप्त कलाकार या महोत्सवात सादरीकरण करीत असतात. ही बाब सातारा जिल्ह्याच्या संगीत क्षेत्रासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरत आहे. त्याला पुरक असे कलादालन ही की कला शिक्षण संस्था ही रहिमतपुरात गाजत आहे. नवीन शिक्षण धोरणाला पुरक मानून याकडे पहात आहे. शहरांमध्ये दिवाळीच्या दरम्यान पहाट पाडवा आणि सांज पाडवा यासारखे सुरेल कार्यक्रम होतात. त्यास अनेक नामवंत कलाकार आपली कला सादर करतात. मात्र, निमशहरी आणि ग्रामीण भागात असे कार्यक्रम होत नाहीत. त्यामुळेच दिव दिवाळी संध्या हा कार्यक्रम वार्षिक संगीत महोत्सव आणि गुरुपौर्णिमा व्यतिरीक्त आयोजित केली जात असल्याचे डॉ. शेंडे यांनी सांगितले.

सख्ख्या बहिणी… मूर्ती लहान, किर्ती महान…
सानवी कुलकर्णी (वय १० वर्षे) आणि सोहना कुलकर्णी (वय ८ वर्षे) या दोन्ही बहिणींनी अत्यंत कमी वयात संगीताच्या श्रेत्रात मोठी कामगिरी केली आहे. अत्यंत सुरेल सतारवादन ही त्यांची खासियत आहे. बालवयातच या दोन्ही बहिणींनी संगीत साधनेचा आविष्कार सादर करण्यात यश मिळविले आहे. आजवर त्यांनी ४८ मैफिलींमध्ये स्वतंत्र सतारवादन केले आहे. त्यामुळेच विविध पारितोषिकांच्या त्या मानकरी आहेत. त्यांनी जागतिक पातळीवर कला आणि सांस्कृतिक मंच गाजविले आहेत.

रंगला प्रश्नत्तरांचा अनोखा तास
याप्रसंगी सतारवादक सानवी आणि सोहना कुलकर्णी यांची मुलाखत कलादालनच्या विद्यार्थ्यांनी घेतली. त्यांनी विविध प्रश्न विचारले. त्यास दोघींनीही दिलखुलासपणे उत्तरे दिली. तुम्ही अभ्यास केव्हा करतात, तुम्ही करिअर कशात करणार आहात, रियाज आणि अभ्यास हे दोन्ही कसे साध्य करतात असे विविध प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारले. त्याचबरोबर सानवी आणि सोहना यांचे वडिल तथा गुरुवर्य समीप कुलकर्णी यांनाही उपस्थित रसिकांनी व बालकांनी विविध प्रश्न विचारले. त्यांनीही मनमोकळेपणाने त्यांची उत्तरे दिली.

Leave a Reply